विविध नावाचे, रंगांचे आणि बहुविध घटकांपासून तयार होणारे खाद्यपदार्थ हे जपानच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. पण, हा देश एका एका माशामुळे चर्चेत आलाय. ज्या माशामुळे चक्क जपानमधील एका शहरात अलर्ट जारी केला आहे. एका सुपर मार्केटमधून अनावधानानं साफ न केलेले ‘फुगू’ मासे विकले गेले. या सुपर मार्केटमधून पाच फुगू माशांच्या पॅकेटची विक्री करण्यात आली होती. पण, आता मात्र ज्या ग्राहकांनी हे मासे खरेदी केले असतील त्यांनी तातडीनं ते परत करण्याचे आवाहन लाऊडस्पीकर, वर्तमानपत्र आणि रेडिओवरुन करण्यात येत आहे. शहरात करण्यात आलेल्या या आवाहनामुळे विकल्या गेलेल्या ३ फुगू माशांचे पॅकेट्स परत मिळवण्यात यश आलं आहे तर उर्वरित दोन पॅकेट्सचा शोध सुरु आहे. फुगू हे मासे जगातील विषारी माशांच्या प्रजातींमध्ये मोडतात. त्यामुळे हा मासा नीट साफ केला नाही आणि विषाचा एक कण जरी राहिला तर खाणाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या माशात असणाऱ्या विषामुळे पक्षाघाताचा झटका येऊ वेळप्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews